‘हिवसाळा’ मुळे पिकांवर परिणाम; बळीराजा चिंताग्रस्त

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण, सूर्यदर्शन नाही यामुळे पुन्हा एकदा आस्मानी संकट येउन ठाकले आहे. नुकतेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांना या हवामानाचा विपरित दणका बसणार आहे.

दरम्यान, गुरूवारी राहुरी तालुक्यातील पश्‍चिमेकडील कुरणदरा व चिखलठाण येथे ढगफुटीसदृश्य अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने बहुतांशी पिके पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. सर्वत्र पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही बंधार्‍यांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे.

चिखलठाण येथे अवकाळी पाऊस व ढगफुटीसदृश्य पाऊस होऊन शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर नैसर्गिकरित्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

यामध्ये कांदा, गहू, ऊस, टोमॅटो, मेथी, गवार, घास, मका आदी पिके जमिनीवर पडून नुकसान झाले आहे. तर शेतातही पाणी साचले आहे.

ढगाळ हवामानामुळे द्राक्ष व आंबा बागायतदारही संकटात सापडले आहेत. कोरोनाचे संकट कायम असताना आता पुन्हा एकदा आस्मानी संकट घोंगु लागल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.