श्रीरामपूर :- तालुक्यात काल दुपारनंतर अनेक ठिकाणी बेमोसमी रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे अनेक पिकांना धोका निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे.
काल श्रीरामपूर शहरासह लगतच्या टिळकनगर, दत्तनगर तसेच तालुक्यातील नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव, सराला-गोवर्धन, निमगाव खैरी परिसरात सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ झिमझिम पाऊस झाला.
तसेच गोंडेगाव, खानापूर, माळवाडगाव, भामाठाण, मातुलठाण, पढेगाव, बेलापूर, मातापूर, भोकर, खोकर, टाकळीभान, घुमनदेव, वडाळा महादेव यासह अनेक भागात पावसाची रिमझिम झाली. उंदीरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा गहू झोपला आहे.
शहर व परिसरात रात्री उशिरापर्यंत अधून-मधून पावसाची रिमझिम सुरु होती. काल सकाळपासूनच ढगाळ हवामान होते; मात्र सायंकाळच्या सुमारास अचानक रिमझिम पाऊस सुरु झाला. अनेक ठिकाणी विजेचा कडकडाट सुुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस शक्यता जाणवत होती.
ज्वारी, हरभरा, कांदा पिके काही भागात काढणीस आलेली आहेत. त्यामुळे अवकाळी पाऊस झाला तर या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. चालू वर्षी रब्बी हंगामात पुरेशा प्रमाणात थंडी पडली नाही तसेच सतत ढगाळ हवामान राहिल्याने अगोदरच सर्वच शेती पिके रोगराईने ग्रासलेली आहे.