अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: देशाचे केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर बदनामी करणारी माहिती प्रसारित केली म्हणून येवला तालुक्यातील अंदरसूल येथील अक्षय रेशमे याच्याविरुद्ध सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन तालुकाध्यक्ष शरद थोरात व शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, रेशमे याने दानवे यांच्या प्रतिमेस धक्का पोहोचेल असे कृत्य केले आहे. दानवे यांचे सामाजिक काम मोठे आहे. ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. आता केंद्रात राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.
प्रसारित केलेल्या मजकुरामुळे समाजात अशांतता निर्माण होईल. त्यामुळे अक्षय रेशमे याच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विजयराव वाजे, अमृत संजीवनीचे संचालक गोपी गायकवाड, नरेंद्र डंबीर, हरिभाऊ गिरमे, अशोक लकारे, अर्जुन मोरे, प्रकाश लकारे, सतिष जाधव, फ्रायडी फर्नांडीस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.