ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाख यांच्यावर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

नेवासे : तालुक्यातील सोनई-करजगावसह १८ गावांच्या पाणी योजनेवरून करण्यात आलेल्या रास्ता रोकोप्रकरणी चार दिवसांनंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सात जणांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

राजकीय वचपा काढण्यासाठी, तसेच राजकीय कोंडी करून गडाखांना चौकशीच्या फेऱ्यात गुंतवण्यासाठी राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

सोनई पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल काकासाहेब देविदास मोरे यांच्या फिर्यादीवरून

गडाख यांच्यासह दादासाहेब शंकर वैरागर, संदीप अशोक कुसळकर, खलील इनामदार, किरण जाधव, गणेश तांदळे, संजय जंगले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासे तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नी सत्तेवर असतानाही आणि नसतानाही शंकरराव गडाख आक्रमक राहिले आहेत.

पाटपाण्याच्या प्रश्नावरून त्यांनी घोडेगाव, वडाळा बहिरोबा येथे केलेली आंदोलने राज्यभरात गाजली.

आंदोलने लोकशाही मार्गाने व शांततेत पार पडूनही त्यांची राजकीय कोंडी करण्यासाठी तालुक्यातील काही राजकीय शक्ती प्रयत्नशील आहेत.

त्यातूनच वडाळा बहिरोबा येथील आंदोलनप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

न्यायालयाने त्यांना उपस्थित राहण्यासाठी वॉरंट बजावले असता पोलिस यंत्रणेने त्यांना पकडण्यासाठी अवलंबलेली शोध मोहीम व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानाच्या झडती प्रकरणाने जिल्हा हादरला होता.

मागील आठवड्यात सोनई-करजगावसह १८ गावांच्या पाणी योजनेच्या प्रश्नावरून ग्रामस्थांसह गडाख यांनी सोनईत सुमारे तीन तास रास्ता रोको करून प्रशासनाला घाम फोडला होता.

मागील अनुभवावरून गडाख शहाणपणा दाखवतील व प्रत्यक्ष आंदोलन करण्यापासून परावृत्त होतील हा संबंधितांचा अंदाज या आंदोलनाने फोल ठरला.

आंदोलन झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर राजकीय खलबते करण्यात येऊन गडाख यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर परत गुन्हा दाखल करण्याचा दबाव पोलिस यंत्रणेवर आल्याची चर्चा आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गडाख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांची राजकीय कोंडी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment