अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : सध्या शहरासह ग्रामीण भागात देखील चोरी, घरफोडी यांसह रस्तालुटीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.त्याचसोबत वाहनचोरीसह मंगळसूत्र चोरी, घरफोडी, हाणामाऱ्या, खून, दरोडा अशा घटना करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाडस वाढल्याने सर्वसामान्य जनतेस मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अशा घटनांत वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे समाजकंटक नागरिकांना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने गंभीर स्वरुपाचे कृत्य करून नागरिकांमध्ये दहशत पसरवितात. असाच प्रकार शहरातील माणिकनगर येथील व्यावसायिक प्रितम गुंदेचा यांच्या बाबतीत घडला.
त्यांच्या बंगल्यासमोर रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या कारच्या काचा फोडून अज्ञात समाजकंटकांनी कार पेटवून दिल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, येथील प्रितम विजय गुंदेचा (रा.नवल मोती बंगला, माणिकनगर) यांनी त्यांची स्वीफ्ट कार (क्र.एम.एच.१२, डी.एस.२२९७) ही घरासमोर उभी करुन नेहमीप्रमाणे कुटुंबासह घरात झोपले होते.पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ वॉचमनचे काम करणारे शिंदे मामा यांनी त्यांच्या बंगल्याचे दार ठोठावून त्यांना उठवून तुमची कार पेटली आहे असे सांगितले.
यावर गुंदेचा यांनी गाडीवर पाणी मारुन आग विझवण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या कारच्या काचा फोडून आत काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून कार पेटवून दिली व तेथून ते पसार झाले.
या घटनेने आजुबाजुचे लोक जागे झाले त्यांनी आरोपींचा जवळपास शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही. गुंदेचा यांच्या घराजवळच राहणारे राजेश चंगेडिया यांच्या बंगल्यावर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात दोन अनोळखी मुले गाडी पेटवताना दिसून आले.