नगर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते अॅड. रामनाथ लक्ष्मण वाघ (वय ८७) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. उद्या गुरुवार सकाळी दहा वाजता रेसिडेन्सिअल हायस्कूल प्रांगणातून त्यांची अंत्ययात्रा निघेल.
अॅड. वाघ हे मुळचे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. वाघ यांनी जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात विकासात्मक काम केले.
१९७२ मध्ये ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण समाजावर गेल्या ५० वर्षांपासून ते विश्वस्त होते. गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा जीवन गौरव करण्यात आला होता.
यशवंतराव चव्हाण व्यासपीठाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. या माध्यमातून त्यांनी व्याख्यानमाला उपक्रम राबविले. वळून पाहताना हे त्यांचे आत्मचरित्र आणि कृतार्थ जीवन प्रवास या पुस्तकांचे त्यांनी लेखन केलेले आहे.