अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. गौरी गडाख यांचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याची घटना नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली.
गौरी यांच्या आत्महत्येने जिल्ह्यात जिल्ह्यात सन्नाटा पसरला होता, गौरी गडाख या माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजय, तर यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या पत्नी. गौरी या लोणी येथील वसंतराव विखे यांच्या कन्या होत.
गौरी गडाख समाजकारणात सक्रिय होत्या. अनेक समाजोपयोगी उपक्रमही त्यांनी राबवले होते. त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोनई येथे वांबोरीत रविवारी सायंकाळी गौरी गडाख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना पुतणे उदयन गडाख यांनी अग्नी दिला होता. या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
गडाख कुटुंबीय नगरच्या राजकारणातील मोठं नाव असल्याने या घटनेने खळबळ उडाली होती.आता तब्बल दोन महिन्यानंतर गौरी यांचे पती प्रशांत गडाख यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. गोरी तू ज्या कारणाने हा निर्णय घेतला आहे. त्यांला शिक्षा ही होणारचं, अगदी तो रक्ताचा असला तरी ही… असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रशांत गडाख यांची फेसबुक पोस्ट – माझ्या आयुष्यात घडलेल्या अत्यंत वेदनादायी प्रसंगात मला धीर देण्यासाठी, माझं सांत्वन करण्यासाठी, तुम्ही सगळे आला होतात. त्यात राजकीय विरोध असणारे पण वेदना जाणारेही होते.परंतु माझी मनस्थिती तेंव्हा कुणालाही भेटण्याची नव्हती.त्याबद्दल सॉरी… माझी स्थिती तुम्ही नक्कीच समजून घ्याल.नियतीने माझ्या वाट्याला मरुस्तपर्यंत जे वेदनेचं गाठोड दिलं आहे,ते मला घेऊनच चालावं लागेल. ‘वर्तमान जगायचंय मला’ ही माझी कविता जी इतरांना प्रेरणा होती ती अशा रीतीने माझीच प्रेरणा होऊन बसेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.
राजकारणात, समाजकारणात, स्वतःच्या आयुष्यात यश-अपयश, कठीण प्रसंग खुप आले पण मी कधीही डगमगलो नाही.उलट त्यांना खंबीरपणे तोंड दिलं, लढलो… पण… गौरी तु मला हरवलं… माझा स्वभाव आलेल्या परिस्थितीशी लढण्याचा आहे,आता कुणाशी लढु..तु माझी पत्नी नव्हती तर आई, बहीण, मैत्रीण सगळं काही होती असं तुच मला म्हणायचीस ना.. तशीही तु मुडी होतीस, कधीकधी अचानक शांत राहायचीसं.. तु चेष्टेत मला म्हणायची कि, ‘तुमच्याआधी मीच जाणार’ पण तु अशी गेलीस की माझी आयुष्यभराची चेष्टा होऊन गेली.
साहेबांची सगळ्यात आवडती सुन नाही तर तु मुलगी, आपल्या नेहल, दुर्वा आणि मी .. आमचं काय चुकलं गं.. रोज रात्री झोपताना असं तुझ्याशी भांडतो मी.. माझा आवाज पोहोचतो का गं तुझ्यापर्यंत.. मला कोणाचीही सहानुभूती नको आहे पण एक नक्की की माझा नियतीवर भरवसा आहे.ज्या कारणाने तु हा निर्णय घेतला असेल,त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी.. हा मला आत्मविश्वास आहे. गौरी मी घरी नव्हतो, तु निष्प्राण..आपल्या लहान मुलीने पाहिलं गं खिडकीतुन.. गौरी,तुला मी नेहमी म्हणायचो की, मी आहे तुझ्यामागे..
मी आता खरंच फकीर झालोय पण मला माझ्यासमोर माझ्या मुली,माझे वडील, माझ्यावर अवलंबून हजारो संसार दिसतात. मित्रांनो मी जरी तुमच्यात आलो तरी ही घटना मला एक दोन महिन्यात सावरू शकत नाही. प्लीज, माझी भावना तुम्ही समजून घ्याल. मी स्वतःहुन ठामपणे सांगायचो की, मी राजकारणात येणार नाही पण माझ्या पत्नीच्या निधनात काहींनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, आता काळच ठरवेल की मी राजकारणात यायचं कि नाही.
पण माझ्या जिवलगांनो, तुम्ही मला जे बळ दिलं ते मी माझ्या आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण माझ्या आयुष्यात माझ्या दोन्ही मुली, माझे आई-वडील आणि तुम्ही सर्व जिवलग मित्र आहात.आपण भेटु,तेंव्हा कृपा करून, माझं सांत्वन करू नका, न विसरता येणारी ती घटना मला निदान तुमच्यात असताना विसरायची आहे. जेंव्हा भेटु तेंव्हा तुमचे काम सांगा, समाजाची कामे सांगा, नवनिर्मितीची चर्चा करा.तुमच्याशी व्यक्त व्हावसं वाटलं म्हणुन हात मोकळा झाला आणि माझं मनही…
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserve