अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- मागील वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ७ हजार ३९४ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. २३ हजार ८६६ शेतकऱ्यांना या आस्मानी संकटाची झळ बसली होती.
या नुकसानीच्या अनुदानापोटी जिल्हा प्रशासनास पहिल्या टप्प्यात १२ कोटी ८१ कोटी १३ हजार रुपये शासनाकडून प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर अनुदान वर्ग करण्यात आले असून, बाधित शेतकऱ्यांच्या खाती अनुदान जमा करण्याचे काम सुरू झाले असल्याची
माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी दिली. मागील वर्षीच्या पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबरच्या दरम्यान जिल्हयात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक ठिकाणी कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षीक असलेल्या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकासान झाले होते.
महसूल व कृषि विभागांच्या संयुक्त पथकाने नोव्हेंबर महिन्यात हे पंचनामे केले. या आस्मानी संकटात कर्जत, श्रीगोंदा, श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर, अकोले, कोपरगांव आणि राहाता तालुक्यातील एकूण ७ हजार ३९४ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले. २३ हजार ८६६ शेतकऱ्यांना या संकटाची झळ बसली.
यात ११ हजार ४४८ शेतकऱ्यांच्या २ हजार १९४ हेक्टर कोरडवाहू क्षेत्राचे, ११ हजार ३३२ शेतकऱ्यांच्या ५ हजार १३४ हेक्टर बागायती क्षेत्राचे आणि ८६ शेतकऱ्यांच्या ६५.४२ हेक्टर बहुवार्षिक (फळबाग) क्षेत्राचे नुकसान झाले.
या नुकसानीच्या अनुदानापोटी एकूण २५ कोटी ६२ लाख २४ हजार रूपयांची रक्कम अपेक्षित असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासन दरबारी पाठवला होता. आता या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात १२ कोटी ८१ लाख १३ हजार रुपयांची रक्कम शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved