कोपरगाव : काळ्या रंगाच्या मोटारसायकवरील तीन अज्ञात इसमांनी गाडी आडवी लावून तालुक्यातील जवळके येथे सराफ व्यवसाय करणाऱ्यास त्याच्या जवळील रोकड व सोन्याचे दागिने यांसह अडीच लाख रुपयांना लुटल्याची घटना गुरुवार, दि. १२ रोजी सायंकाळी हॉटेल माईलस्टोन जवळ, कोपरगाव येथे घडली.
याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरील तीन संशयित चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महेंद्र मुरलीधर कुलकर्णी,वय ४८, रा. सिध्दीविनायक टॉवर्स सप्तर्षी मळा, कोपरगाव यांचा तालुक्यातील जवळके येथे सराफी व्यवसाय आहे.
गुरुवार, दि. १२ रोजी सायंकाळी ते दुकानातील कामकाज आटोपुन त्यांच्या दुचाकीवरुन कोपरगावकडे येत असताना हॉटेल माईलस्टोन जवळ पाठीमागुन एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन आलेल्या तिन इसमांनी कुलकर्णी यांच्या मोटरसायकलला त्यांची मोटरसायकल आडवी लावली.
तसेच कुलकर्णी यांना कोयता व तलवारीचा धाक दाखवुन खाली पाडुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्याजवळील १८ हजारांची रोकड व बॅगेतील ८० ग्रॅम सोन्याचे दागीणे चोरुन पळून गेले. या मारहाणीत कुलकर्णी हे जखमी झाले असून सोन्याच्या दागिन्यांसह एकूण २,५८,००० रुपयांचा ऐवज लुटून नेला असल्याची फिर्याद कुलकर्णी यांनी कोपरगाव शहर पोलिसात दिली आहे.
सदर मजकुराच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळास श्री.मदने,उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपुर चार्ज शिर्डी विभाग, स.पो.नि. बोरसे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, पोसई बी.सी.नागरे यांनी भेट दिली आहे.