हर्षवर्धन सदगीरची कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद- ना. थोरात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोले तालुक्यातील कोंभाळणेसारख्या छोट्याशा गावातून जिद्द व मेहनतीच्या बळावर महाराष्ट्र केसरी मिळविलेला हर्षवर्धन सदगीरची कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

यशोधन संपर्क कार्यालयात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी सत्कार केला. यावेळी माजी आ. राहुल जगताप, माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस, सुभाष सांगळे, दत्तू कोकणे, तान्हाजी शिरतार, के. के. थोरात, युवा कार्यकर्ते मिलिंद कुकडे, भगूर व्यायामशाळेचे गोरख नाना बलकवडे, हर्षवर्धनचे आजोबा सदगीर बाबा, नाशिक मनपाचे नगरसेवक राहुल दिघे, दीपक भोसले, रमेश शिंदे, रमेश कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. थोरात म्हणाले, अकोले तालुक्यातील आढळा खोऱ्यातील दुर्गम भागात असलेले कोंभाळणे गावाने पद्मश्री राहीबाई पोपेरे व हर्षवर्धन सदगीर ही दोन रत्ने जिल्ह्याला दिली आहे. पद्मश्री पोपटराव पवार, हर्षवर्धन सदगीर व पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे कार्य जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. कुस्ती हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे.

परंतु, मधल्या काळात काहीशा मंदावलेल्या या खेळाने पुन्हा एक मोठे वलय निर्माण केले आहे. हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरी मिळवून जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहत आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे.

तसेच मोबाइलऐवजी मैदानाकडे वळावे, असे सांगताना हर्षवर्धन सदगीर यांनी आपले कुस्तीतील सातत्य कायम ठेवताना देशाकरिता खेळावे, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. हर्षवर्धन सदगीर म्हणाले, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राचे नेते आहे.

त्यांच्या हस्ते सन्मान होणे ही अतिशय आनंदाची बाब असून, यापुढेही आपण खेळाशी प्रामाणिक राहून अकोले व संगमनेरसह जिल्ह्याचे नाव मोठे करू, असा विश्­वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment