अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शेवगाव तालुक्यात काल अखेर पुणे, मुंबई व देशांतर्गत जोखिमग्रस्त भागातून 10 हजार 893 व्यक्ती तालुक्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 हजार 40 नागरिकांच्या हातावर होम क्वॉरन्टाइनचे शिक्के मारले आहेत.
तर परदेशातून 7 नागरिक येथे आलेले आहेत. त्यांच्या सर्व तपासण्या झालेल्या असून त्या निगेटीव्ह आल्या आहेत. आज अखेर तालुक्यात एकही करोनाबाधीत रुग्ण नाही. सर्वांनीच आतापर्यंत पाळलेल्या स्वयंशिस्तीचे हे फलित असल्याचे मत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी व्यक्त केले आहे.
करोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्या अगोदर मुंबई, पुण्यासह देशातील इतर भागातील नागरिक गावाकडे आले आहेत. तालुक्यातील अशा व्यक्तींची यादी करण्यात आली आहे.
त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र हातगाव अंतर्गत जिल्ह्याबाहेरुन आलेल्या 1 हजार 257 व्यक्तिंपैकी 767 जणांना शिक्के मारण्यात आले. तसेच दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 599 पैकी 507, भातकुडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र – 631 पैकी 525,
घोटण प्राथमिक आरोग्य केंद्र- 1 हजार 442 पैकी 908, हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्र- 1 हजार 735 पैकी 1 हजार 105, तर चापडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 हजार 229 पैकी एक हजार 228 व्यक्तिंना, अशा तालुक्यात जिल्ह्याबाहेरून आलेल्या एकूण 10 हजार 893 व्यक्तिपैकी 5 हजार 40 व्यक्तिंच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत.
उर्वरित व्यक्तिंच्या हातावर शिक्के मारण्याचे काम दोन दिवसात पूर्ण होणार आहे. या व्यक्तींना घरातच राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यात कुठल्याही व्यक्तीला करोनाची लक्षण दिसून आलेली नाहीत.
तालुक्यातील कऱ्हेटाकळी व महालटाकळी या ठिकाणी जिल्हा सिमा सिलबंद केलेल्या आहेत. तेथे पोलीस, महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. तालुक्यातील बहुतांश गावात जंतूनाशक औषधांची फवारणी युद्ध पातळीवर चालु असून सर्व गावांमध्ये फवारणी केली जाणार आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com