अहमदनगर मधील ‘तो’ भाग हॉटस्पॉट केंद्र जाहीर , प्रतिबंधाची मुदत आता 10 मेपर्यंत वाढवली !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तू विक्री इत्‍यादी दि. 6 मे 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यत बंद ठेवण्‍याबाबत आदेश देण्‍यात आले होते.

दिनांक 26 एप्रिल रोजी जामखेड शहरातील 03 व्‍यक्‍ती कोरोनाबाधित आढळल्याने येथील प्रतिबंधात्मक आदेशात दिनांक 10 मे, 2020 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी दिनांक 10 मे, 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ध्वनिक्षेपकाद्वारे आदेशाची माहिती द्यावी. कंट्रोल रुम स्थापन करुन 24×7 कार्यरत ठेवावी.

सदर ठिकाणी 3 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येवून प्रत्येक शिफ्टमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्द करण्यात यावेत. कंट्रोल रुम मध्ये रजिस्टर ठेवून त्यामध्ये नोंदी घेण्यात याव्यात व नागरीकांना आवश्यक त्या जिवनावश्यक वस्तु सशुल्क पुरविण्यात याव्यात. तसेच प्राप्त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात यावे.

या क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्यक असणा-या बाबी जसे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पूरविण्यात याव्यात. त्याकामी जिवनावश्यक वस्तुंचे व्हेंडर निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्यादी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे.

जामखेड शहर या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, कर्जत हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बॅकींग सुविधा बँक प्रतिनिधी मार्फत उपलब्ध करुन द्याव्यात. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्ते बंद करुन एकच रस्ता बॅरिकेड्सद्वारे खुला ठेवावा. या क्षेत्रामध्ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना संबंधीत सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत.

तसेच या प्रतिबंधित भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरीकांच्या हालचालींवर निर्बंध आणने आवश्यक ठरले आहे. त्यामुळे सदर भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्थापनांकडून देण्यात आलेली वाहन वापर व वाहतूकीची सबलत रह करण्यात येत आहे, असे या आदेशात म्हटले आहे.

या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्यार्थ असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्याच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास,अशा व्यक्तींची त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्याची सुविधा संबंधीत आस्थापनांनी उपलब्ध करुन दयावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्यांच्या हालचालींवर निर्बंध घालणे शक्य होईल.

कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment