जामखेड – महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 117 कोटी रुपयांच्या जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेला आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळाली.लवकरच या कामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आ. पवार यांनी दिली. पाणीपुरवठा योजनेला मंजूर झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जामखेड शहरातील महिलांच्या डोक्यावर हंडा उतरणार आहे.
गेल्या चार पाच वर्षांपासून जामखेड तालुक्यात समाधानकारक पाऊस होत नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणारा भूतवडा तलावातील पाणी शहरासाठी कमी पडत होते. तसेच अपुऱ्या पावसामुळे तलाव देखील उन्हाळ्यात कोरडा पडत होता. परिणामी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. सध्या देखील शहरात शासकीय टॅंकर व काही खाजगी टॅंकरने नागरीकांना पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, अशी मागणी नागरीकांकडुन सातत्याने होत होती.

तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी देखील गेल्या दोन वर्षांपासून नगरविकास खात्याकडे मागणी करत होते. हीच मागणी लक्षात घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 64 कि.मी लांब असलेली 117 कोटी रुपयांची महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत ही पाणीपुरवठा योजना मंजूर दिली होती. मात्र नंतर हि योजना अडगळीत पडली.
पाच वर्षे मंत्री असुन निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन पालकमंत्र्यांनी तत्वता मान्यतेचा साधा कागद दाखवून दिखावा केला. मात्र पण त्या दिखाव्याला प्रत्यक्ष मूर्तस्वरूप आ. पवार यांनी आणले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून, तांत्रिकदृष्ट्या त्याचा सखोल अभ्यास करून आणि हे सर्व नियोजन करून अखेर पाणीपुरवठा योजनेच्या या कामास प्रशासकीय मान्यता मिळवली. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न सुटणार नसून टंचाई काळात येथे लागणाऱ्या टॅंकरच्या खर्चाचा सरकारी तिजोरीवर पडणारा बोजाही कमी होणार आहे.
‘मी बोलतच नाही तर करूनच दाखवतो’!
महिलांकडून पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी होत होती. पाठपुरावा करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे संबंधित सर्वच मंत्री अधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला आणि योजनेस मंजुरी मिळाली. त्यामुळे ‘मी फक्त बोलतच नाही तर प्रत्यक्षात करून दाखवतो’ असेही मत पवार यांनी बोलताना व्यक्त केले.