अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ पाथर्डी :- विकास कामांसाठी आम्ही सदैवं कटिबद्ध आहोत. मागील पाच वषांर्त माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून निधी सहज उपलब्ध होत होता.
भौगोलिक दृष्टया विचार केल्यास जिल्ह्यात जलसंधारणाची सर्वाधिक कामे पाथर्डी -शेवगाव तालुक्यात झाली आहेत, कामात शासन असेलच त्याचबरोबर जनकल्याण, पाणी फाउंडेशन ,लोकसहभाग आदी माध्यमातून परिसरात मोठे काम झाले, विकास निधीसाठी पाठपुरावा करू, प्रसंगी भांडू, पण विकास निधी आणूच, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे ७८ लाख खर्चाच्या बंधाऱ्याच्या भूमिपूजनप्रसंगी आ. राज़ळे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, सत्तेच्या काळात मतदारसघात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे केल्याने तालुक्यातील पाणीपातळी वाढली.
पुढील काळातही विकास कामे करताना गावागावांतील ओढे, नदीवर बंधारे बांधण्याच्या कामास प्राधान्य देण्यात येईल. विकास कामांत भेदभाव करणार नाही, अडचणीच्या काळात भाजपा नेत्या माजी मंत्री पकंजा मुंडे यांना साथ देणार आहोत, असे त्या म्हणाल्या.