नेवासा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी भाऊराव उर्फ चंद्रकांत भाऊसाहेब पवार (रा. लोहगाव, सोेनई, ता. नेवासा) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी भाऊराव उर्फ चंद्रकांत पवार याने सन २०१८ साली पिडीत मुलगी ही दहावीचा पेपर देण्यासाठी जाताना व पेपर देवून मागे येत असताना तिला अश्लिल भाषा वापरली. त्यावेळी आरोपीने पिडीतेचा हात धरून दमदाटी केली. त्यावेळी पिडीतेचे नातेवाईक रस्त्याने मागून आल्याने आरोपी पळून गेला.
पिडीत मुलगी ही घरी जावून तिने तिच्या घरच्यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर पिडीतेने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोनई पोलीस ठाण्याने तपास करून आरोपी भाऊराव उर्फ चंद्रकांत पवार याच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ३५४ (अ), ३५४ (ड) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम ७, ८ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सदर गुन्ह्याचा तपास होवून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले.
सदरचे साक्षीपुरावे व सरकार पक्षातर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी आरोपीस विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ८ अन्वये गुन्ह्याकामी तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली.
तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम १२ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. सदरच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले.