Ahmednagar Breaking : गणेश कारखान्याची चौकशी करा, पण तुमच्या मागे काय लागणार हेही लक्षात ठेवा !

Published on -

Ahmednagar Breaking : गणेश साखर कारखान्याची जी चौकशी करायची ती करा, अशा धमक्यांना आपण घाबरत नाही. पण तुमच्यामागे काय लागणार आहे हेही लक्षात ठेवा असा सूचक इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना दिला.

महसूल मंत्री विखे पाटील हे काल दुपारी संगमनेर येथे आले होते. शासकीय विश्रामगृहात ते काही वेळ थांबले होते. यावेळी पत्रकार सोबत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ते पुढे म्हणाले, आमदार थोरात यांनी केलेल्या आरोपांना उत्तरं देण्याची गरज नाही.

संगमनेर तालुक्यात फुकटचे श्रेय लाटण्याची पद्धत ही जुनीच आहे. पुणे-नाशिक महामार्गाचे काम हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारच्या निधीतून झाले. सहाजिकच त्याचे उद्घाटन भाजपा कार्यकर्त्यांनी करणे काहीही गैर नाही.

त्यांना आमचा हस्तक्षेप वाटत असेल, तर त्यांच्या आरोपांची दखल घेण्याची गरज नाही. कारण आमची संस्कृती दिवे लावण्याची आहे बंद करण्याची नाही. राज्यात आणि केंद्रात आमचे सरकार आहे. त्यांच्या निधीतील कामांचे उद्घाटन आम्ही करणार. कुणाला काय वाटते याची चिता आम्हाला नाही.

आमदार थोरात यांच्या आरोपांची फारशी दखल घ्यायची गरज नाही. पस्तीस वर्ष जे तालुक्याला पाणी देवू शकत नाही, त्यांनी घडवायची आणि मोडायची भाषा करु नये. राहाता तालुका टँकरमुक्त आहे, संगमनेर तालुक्यात मात्र ३० पेक्षा जास्त टँकर सुरु आहेत. हा मोठा फरक जनतेच्या समोर आहे.

त्यामुळे तालुक्याला पाणी देण्याची जबाबदारी आता आमच्या सरकारची आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पूर्ण करुन तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देणे हे आमची जबाबदारी पूर्ण करणार आहोत.

गणेश कारखान्या संदर्भात आमदार थोरात यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री विखे पाटील म्हणाले की, त्यांना काय चौकशी करायची त्यांनी ती करावी. अशा धमक्यांना आम्ही भित नाही. स्वताः काय करायचे ते करावे.

बंद पडलेला कारखाना चालू केला. कामगारांचे पगार दिलेत. यापूर्वी कामगारांचे पगार बुडवून अनेकजन पळून गेले. राज्यातील पहिला प्रयोग हा सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्याबाबतचा हा गणेशच्या निमित्ताने यशस्वी करुन दाखविला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News