रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सुख-दु:खाची खबरबात देण्यासाठी विशेषत: लग्न पत्रिका व इतर निमंत्रण देण्यासाठी सोशल मीडिया सध्या वरदान ठरत असल्याने वेळ व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.
कमी वेळेत किंवा अचानकपणे ठरलेला शुभ मुहूर्त या कामासाठी लागणाऱ्या वेळेचे बंधन पाहता अनेकदा वधू व वर पक्षाची मोठ्या प्रमाणात धांदल उडते.
तसेच निमंत्रण पत्रिका छापल्यानंतरही नजर चुकीने अनेकांना इच्छा असूनही वेळेअभावी पोहच करू शकत नाही किंवा लक्षात राहत नाही.
परिणामी पत्रिका न मिळाल्याने काही नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या नाराजीला वधू-वर पक्षाच्या कुटुंबांना सामोरे जावे लागते. परंतु, काळाच्या ओघात मोबाइल क्रांतीने आधुनिक पाऊले टाकत, मोबाइल तंत्रज्ञान वापरून, नवनवीन ॲप्सद्वारे हवी तशी डिझाईन करून सुरेखपणे विविध प्रकारचे रंग वापरून पत्रिका तयार करण्यात येतात.
विशेष म्हणजे अल्प शिक्षण असलेले तरुण सुद्धा यात मागे नाहीत. ही त्याची जमेची बाजू म्हणावी लागेल. तसेच यामध्ये वेगवेगळ्या ॲपद्वारे लहान एक मिनिटाचा व्हीडियो क्लिप सुद्धा सहजपणे तयार करून व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदींच्या सोशल मीडियाच्या साह्याने काही क्षणातच परदेशी व्यक्तीला सुद्धा पाठविता येतात. पत्रिका मिळाली का नाही याची घरबसल्या फोन करून लगेच खातरजमा केली जाते.
एरवी अनेकदा अनेकांना डोकेदुखी ठरलेला सोशल मीडिया मात्र लग्न सोहळा, शुभ मुहूर्त, वास्तुशांती, साखरपुडा, लहान-थोरांचे वाढदिवस तसेच शालेय विद्यार्थी, तरुणांचे, पुढाऱ्यांच्या निवडीबद्दल फोटो सेशन करून तसेच काही दु:खाचे प्रसंग त्याचे कार्यक्रम आदींसाठी काम करण्यासाठी सोशल नेटवर्क तरुणांचा अविभाज्य घटक बनला आहे.
विशेष म्हणजे अशा पत्रिकेचे अनेक समाजबांधवांनी स्वागतही केले आहे. कारण अशा सोहळ्याच्या पत्रिका वाटताना निघालेल्या मंडळींचे दुर्दैवाने अपघात होतात. ते टाळता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे अनेक समाजबांधव व नातेवाईकांनी सोशल मीडियावर भेटलेल्या निमंत्रण पत्रिकांचे आभार मानून आनंद व्यक्त करता ही बाब मात्र भूषणावह आहे.