केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा : कर्डिले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : राज्यातील व देशातील भाजप सरकारने भरीव विकासकामे करून राज्यात व देशात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत पारदर्शक कारभार केला, राज्य सरकारच्या माध्यमातून राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघात केलेली विकासकामे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन युवानेते अक्षय कर्डिले यांनी केले.

आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली बुऱ्हाणनगर येथे आयोज़ित नगर- पाथर्डी- राहुरी मतदारसंघातील तरुणांच्या बैठकीत ते बालत होते.

शनिवार, दि. २४ ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा राहुरीत येत असून, त्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा येथे होणार आहे. राज्य व केंद्र सरकारकडून मतदारसंघासाठी मिळालेल्या निधीतून कोणत्या गावात कोणती विकास कामे केली, शासन स्तरावर राबवण्यात आलेल्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करावा.

देशाचे तरुण मुत्सद्दी आणि स्वतंत्र विचारांचे आहेत. तरुणांनी भाजपवर मोठा विश्वास दाखवला म्हणूनच ठराविक पक्षांची सत्तेत राहण्याची मक्तेदारी संपुष्टात आली. सर्वसामान्यांची कामे फोनवरून तत्काळ मार्गी लावण्याचे काम आ. कर्डिले करतात.

जनतेमध्ये राहून जनतेचे सुख -दु:ख समजून घेत त्यांना न्याय देण्याचे काम करतात. लोकप्रतिनिधी म्हणून बाराही महिने सामाजिक कामात असतात, त्यामुळे निवडणूकपूर्व तयारी करण्याची त्यांना गरज पडत नाही. पंचवीस वर्षांपासून ते आमदार म्हणून सर्वसामान्यांची सेवा करत आहेत, असे अक्षय कर्डिले म्हणाले.

या वेळी बाजार समितीचे संचालक संदीप कर्डिले, भैरवनाथ कोतकर, युवानेते दत्ता तापकिरे, रवींद्र कर्डिले, बंडू पाठक, चेअरमन दीपक लांडगे, नवनाथ आरोळे, राहुल अकोलकर यांच्यासह तरुण मोठया संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment