नगर दक्षिणेच्या राजकारणात भाजपा अंतर्गत पुन्हा एकदा नव्याने फेर जुळण्याचे प्रयत्न होत असून, आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार मोनिकाताई राजळे यांच्याभोवती भाजपचे राजकारण आगामी काळात फिरण्याची चिन्हे आहेत.
भाजपासह सत्तेचे प्रमुख शक्तीकेंद्र बनलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच महाजनादेश यात्रेच्यानिमिताने पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांनी आ. कर्डिले यांच्या लोकसभा निवडणुकीतील योगदानाबद्दल भरभरून कौतुक केले.

या कौतुकामागील राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनीही सूचकपणे हसून दाद दिली. एक प्रकारे कर्डिले यांच्या कामाची मला माहिती आहे, असा मूकसंदेश मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेत्यांना दिला.
राजळेंच्या या वाक्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांनीही भुवया उंचावून मुख्यमंत्र्यांकडे बघितले. हा सर्व राजकीय सारिपाटावरील खेळ अवघ्या एक मिनिटात झाला. लोकसभा निवडणुकीदरम्यान नगर दक्षिणमधून राहुरी -नगर -पाथर्डी मतदारसंघातून आ. शिवाजीराव कर्डिले यांनी स्वत:च्या जावयाची उमेदवारी विरोधात असूनही त्याकडे फारसे लक्ष न देता पक्षादेश व आमदारकीची जबाबदारी ओळखत नेटाने काम केले.
नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधत विखेंच्या कार्यकर्त्यांना यंत्रणेत समाविष्ट केले. काही हितशत्रूंना भविष्यातील राजकारणाची चाहूल लागल्याने त्यांनी आ. कर्डिले यांच्या विरोधात विखे यांचे कान भरले. काही महाभागांनी तर जुन्या संभाषणाच्या क्लिपही व्हायरल करत ऐन निवडणुकीत गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न केला.
पक्षश्रेष्ठींनी मात्र कर्डिले यांच्यावर विश्वास व्यक्त करत काम करत राहण्याचे आदेश दिले. नगर जिल्ह्याच्या राजकारणात पक्ष कोणताही असला तरी सहकारापासून गावपातळीपर्यंत प्रमुख राजकारणाचे केंद्र म्हणून आ. कर्डिले यांच्याकडे पाहिले जाते.
अत्यंत मुत्सद्दी, मुरब्बी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असलेला नेता, अशी ओळख भाजपा कार्यालयात चर्चेचा विषय ठरली आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणात कर्डिले -राजळे यांना दुखावून फार काही साध्य होणार नाही. त्यामुळे पक्षापुढील समस्यांमध्ये वाढ होऊ शकते, या मुद्याकडे स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींची लक्ष वेधले.
दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक होऊन खासदार सुजय विखे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. कर्डिले यांचा करिश्मा या निवडणुकीतही चमत्कारिक ठरून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य राहुरी मतदारसंघातून विखे यांना मिळाले. तरीही विखे यांचे समर्थक कर्डिले यांना आपले मानायला तयार नव्हते. आज जे सुपात आहेत, उद्या ते जात्यात येतील, अशी वेळ ओळखून राजळे -कर्डिले यांनी मुंबई व दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींकडे जिल्ह्याची बाजू मांडली.
स्थानिक राजकारणातही दोघांचे कार्यकर्ते जवळीक ठेवत परस्पर संपर्काने अन्य नेत्यांचा दबाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात या जोडगोळीने प्रयत्न सुरू केला आहे. याला मोठ्या प्रमाणावर यश येऊन मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दोघांनाही अभय देत कसलीही चिंता करू नका, आपले कार्य नेटाने सुरू ठेवा, असे सुचवले.
- 6500mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग! Vivo Y39 5G दमदार फीचर्ससह लाँच
- PNB च्या ग्राहकांसाठी मोठी संधी ! 400 दिवसांच्या एफडीवर मिळणार 7.75% व्याज, 4 लाखाच्या गुंतवणुकीत किती रिटर्न ?
- Samsung Galaxy M16 5G आणि M06 5G लाँच होताच स्वस्तात विक्रीला Amazon वर बंपर डील्स
- Volvo XC90 नव्या रूपात येणार ! 25 KMPL मायलेज देणारी 7 सीटर SUV
- Nothing चा नवा गेमचेंजर ! CMF फोन 2 मध्ये तगडा प्रोसेसर आणि 50MP कॅमेरासह लॉन्च होणार