अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या नमिता गोपाळघरे तर उपसरपंचपदी रंजना लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे.
आजवर ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात होती मात्र आता तिच्यावर ताबा घेत आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत प्रा. राम शिंदे यांना हादरा दिला आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी असणारी खर्डा ग्रामपंचायत सरपंच पदाकडे सर्वच राजकीय धुरीणांची नजर लागली होती. या निवडणुकीत सतरा पैकी १० सदस्य राष्ट्रवादीचे तर भाजपचे केवळ ७ सदस्य निवडून आले होते.
आज झालेल्या गुप्त मतदानात राष्ट्रवादीच्या नमिता गोपाळघरे यांना तर भाजपाच्या सरपंच पदाच्या उमेदवार संजीवनी पाटील यांना ६ मते तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रंजना लोखंडे यांना १० तर भाजपाचे मदन पाटील यांना ७ मते मिळाली.
सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपाचे १ मत फुटल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून, गुप्त मतदानातून त्यांनी राष्ट्रवादीला मतदान केल्याने भाजपचा कोणता सदस्य फुटला अशी चर्चा खर्डा शहरात होती.
सुरवातीपासूनच आमदार रोहित पवार व प्रा. राम शिंदे यांनी खर्डा ग्रामपंचायतची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र यात आ.पवार यांनी बाजी मारत प्रा. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेली ही ग्रामपंचायतवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2021, all rights reserved