अहमदनगर : शहरातील जागरूक नागरिक व युवकांनी एकत्रित येऊन नुकतीच नगर विकास मंचाची स्थापना केली आहे. या मंचाच्या निमंत्रकपदी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा मंचाच्या सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
मंचाच्या वतीने शहरात आगामी काळात विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. शहरातील महिला, युवा वर्ग, नोकरदार, व्यापारी, डॉक्टर, वकील, उद्योजक, क्रीडा, जेष्ठ नागरिक, इतर दुर्बल घटक आदी विविध घटकांशी मंचाच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे.
मंचाच्या वतीने लोकसहभागातून शहर विकासासठी चळवळ उभी केली जाणार असून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. किरण काळे यांनी निमंत्रक पदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे मंचाला विकासाचे व्हिजन असलेले नेत्तृत्व मिळाले असून त्यामाध्यमातून मंच आगामी काळात शहरात अत्यंत ‘महत्वाची आणि निर्णायक भूमिका’ पार पाडेल असा विश्वास सुकाणू समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
किरण काळे यांनी या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, शहरातील नागरिक, मतदार आता जागरूक झाले आहेत. विशेषतः युवा वर्ग आता विचार करू लागला आहे. नगर विकास मंच हे राजकीय व्यासपीठ नसून शहराच्या उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीसाठी जागरूक नगरकरांनी एकत्रित येऊन उचलेले आश्वासक पाऊल आहे. त्याबद्दल मी मंचाचे अभिनंदन करतो.
“ध्यास विकसित नगर शहराचा, सामान्य नगरकरांच्या स्वप्नांचा” हे मंचाचे ब्रीदवाक्यच मंचाचा स्थापने मागील उद्देश स्पष्ट करणारे असून अत्यंत बोलके आहे. लवकरच मंचाच्या वतीने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल असे यावेळी काळे यांनी नमूद केले आहे. तसेच नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने मंचाच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.