किरण काळेंची अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख पदी निवड

स्व. अनिलभैय्या राठोड यांची इच्छा पूर्ण झाली - काळे 

Updated on -
शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख पदी किरण काळे यांची निवड करण्यात आली आहे. तशी घोषणा मुंबईतून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली आहे. काळे यांच्या रूपाने शहर शिवसेनेला आक्रमक तरुण नेतृत्व लाभले आहे.
मागील महिन्यात काळेंनी मातोश्री येथे ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला होता. त्याच वेळी ठाकरे यांनी काळे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्या बाबत सुतोवाच केले होते. त्यानंतर आता ठाकरे यांनी शहर शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा ही काळे यांच्या खांद्यावर सोपविली आहे.
अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. सलग पंचवीस वर्ष आमदारकी, अनेक वेळा महापौर, उपमहापौर, स्थायी समितीवर शिवसेनेचा वरचष्मा राहिलेला आहे. अलीकडील काळात काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले. तरी काळे यांच्या रूपाने शिवसेनेत इन्कमिंग देखील झाले आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना संघटना बांधणीचे आव्हानात्मक काम काळे यांना करावे लागणार आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना किरण काळे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्व. अनिलभैय्या राठोड यांनी मला शिवसेनेत येण्याची गळ घातली होती. मात्र त्यावेळी महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेला मोठा कालावधी लागला. त्यामुळे त्यावेळी प्रवेशाचा विषय लांबला.
दरम्यानच्या काळात वेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या. दुर्दैवाने भैय्यांचं कोरोना मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर माझ्यावर शहर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आली. पण आज नियतीच वर्तुळ पूर्ण झाल आहे. स्व.अनिलभैय्या हयात नाहीत.
पण त्यांची इच्छा आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. स्व.अनिलभैय्या यांना अभिप्रेत असणारं, नव्या – जुन्यांचा मेळ घालत शिवसेना संघटना बांधणीच आणि नगर शहरातील प्रत्येक घटकाच्या हक्कासाठी लढण्याचं काम मी करणार आहे. हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल असे काळे म्हणाले.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News