लवकरच लिंकरोड पुलाचे काम पूर्ण होणार : सभापती मनोज कोतकर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- केडगाव उपनगराच्या विकासासाठी व विस्तारीकरणासाठी आ. संग्राम जगताप यांनी लिंकरोडच्या कामासाठी दीड कोटी रुपये व त्यावरील खोकर नदीवरील पुलासाठी १ कोटी रुपयांचा निधी असा सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करुन आणला व कामाला सुरुवातही झाली.

रस्त्याचे व पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आणि कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे प्रशासनाने २४ मार्चला काम बंद केले. कामगारही निघून गेले. त्यानंतर पावसाळा सुरु झाल्यामुळे कामाला व्यत्यय येत होता.पुलाजवळील तात्पुरत्या स्वरुपाचा बायपास तयार करण्यात आला.

परंतु मोठ्या पावसामुळे हा पुलही दोन-तीन वेळा वाहून गेला. रात्री- अपरात्री पावसाच्या पुरामुळे कुठलेही अनूचित घटना घडू नये यासाठी रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. आजपासून पुलाच्या कामाबरोबरच तात्पुरत्या स्वरुपाच्या बायपास रस्त्याचे काम करुन वाहतुकीस खुला केला जाणार आहे.

लवकरच पुलाचे काम पूर्ण करुन वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे प्रतिपादन स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केले. पुलाचे व शेजारील तात्पुरत्या स्वरुपातील बायपास रस्त्याच्या कामाची पाहणी करताना स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेसचे अध्यक्ष वैभव ढाकणे, संभाजी पवार, भूषण गुंड, माऊली जाधव, सागर सातपुते, भरत गारुडकर, सागर भांबरे, सोनू जगताप, अमित खामकर, दीपक खेडकर, अमोल कांडेकर, गणेश बोरुडे, मयूर भापकर, संतोष शेटे, भाऊ शेटे, रावसाहेब शेटे, समशून खान आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. विधाते म्हणाले की, नगर शहराबरोबर उपनगराच्या विकासासाठी पहिल्यांदाच मोठ्या स्वरुपात निधी उपलब्ध झाले. लिंकरोडच्या विकासासाठी आ. संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला. कोरोना व पावसामुळे रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही.

आता पुलाचे काम सुरू झाले आहे. लवकरच पूर्ण होऊन नागरिकांसाठी हा रस्ता खुला केला जाईल, असे ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोज भोसले म्हणाले की, लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून काम बंद करण्याचे आदेश प्रशानाने दिल्याने पावसाळ्यापूर्वी पुलाचा स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही,

अन्यथा पावसाळ्यापूर्वीच वाहतूक सुरू झाली असती. त्यानंतर सतत पाऊस असल्याने काम करणे शक्‍य झाले नाही. तात्पुरत्या स्वरुपात तयार केलेला बाह्यवळण रस्ताही पावसाच्या पुरामध्ये सारखा वाहून जात होता. अशा परिस्थितीत कुठलेही अनूचित प्रकार घडू नये,

यासाठी बांधकाम विभागाच्यावतीने पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंद करण्यात आली होती. आता पुलाचे काम सुरू झाले आहे, त्याचबरोबर तात्पुरत्या स्वरुपात बाह्यवळण रस्त्याचे काम करुन वाहतूकीस खुला केला आहे, असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment