अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी (2 फेब्रुवारी) एक अप्रत्यक्ष वाद निर्माण झाला. उपांत्य फेरीच्या सामन्यात पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात तगडी लढत झाली. मात्र, या सामन्याचा निकाल लागल्यानंतर परिस्थिती बिघडली. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
शिवराज राक्षेच्या पराभवानंतर…
या लढतीत पृथ्वीराज मोहोळने शिवराज राक्षेचा पराभव केला आणि पंचांनी निर्णय जाहीर केला. मात्र, हा निकाल मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने आक्षेप घेतला. त्याने पंचांच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आणि संतापाच्या भरात पंचांना लाथ मारल्याचा आरोप आहे. त्याचसोबत पंचांची कॉलर पकडण्याचा देखील आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे मैदानात काहीवेळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत वाद निवळण्याचा प्रयत्न केला, मात्र या घटनेमुळे स्पर्धेला गालबोट लागले.
पाठ टेकली नव्हती, निकाल मान्य नाही
शिवराज राक्षेने या प्रकरणावर आपली बाजू मांडताना सांगितले की, “माझी पाठ टेकली नव्हती, त्यामुळे हा निकाल स्वीकारता येणार नाही.” तसेच, पंचांना लाथ मारल्याच्या आरोपांना त्याने संपूर्णपणे फेटाळून लावले आहे. स्पर्धेच्या निकालावर पुनर्विचार करण्याची मागणीही त्याने केली आहे.
अजित पवारांच्या उपस्थितीतच गोंधळ
या स्पर्धेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा वाद सुरू झाला. हा प्रकार घडल्यानंतर शिवराज राक्षेने सामन्याच्या निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता कुस्ती महासंघ आणि पंच मंडळी यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Related News for You
ही संपूर्ण घटना महाराष्ट्र केसरीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत घडल्याने कुस्ती विश्वात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने स्पर्धेच्या नियमानुसार शिवराज राक्षेवर काही कारवाई केली जाणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.