Maharahstra Kesari : पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’, अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडवर विजय

Published on -

महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना प्रचंड उत्साहात पार पडला. आहिल्यानगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत कुस्तीशौकिनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अखेर, पृथ्वीराज मोहोळ यांनी विजय मिळवत ‘महाराष्ट्र केसरी’चा मानाचा किताब पटकावला.

संघर्षमय अंतिम सामना

स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात दोन वेगवेगळ्या विभागांमधील विजेते एकमेकांसमोर उभे ठाकले. महेंद्र गायकवाडने माती विभागातून अंतिम फेरी गाठली होती, तर पृथ्वीराज मोहोळ मॅट विभागातून पुढे सरसावले होते. दोन्ही कुस्तीपटूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. कुस्ती चितपट न होता, प्लॅईंटच्या आधारे पृथ्वीराज मोहोळ यांनी कुस्ती जिंकत ‘महाराष्ट्र केसरी’ किताबावर आपले नाव कोरले.

वादग्रस्त उपांत्य फेरीत गोंधळ

उपांत्य फेरीत डबल महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगला. मात्र, या सामन्यात वाद निर्माण झाला. शिवराज राक्षे यांनी चितपट झाल्याचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत पंचांवर आक्षेप घेतला आणि रागाच्या भरात त्यांच्या कोलरला हात घातला व लाथ मारली.

या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, पंचांनी अंतिम निर्णय देत पृथ्वीराज मोहोळ यांना विजयी घोषित केले.

गायकवाडची दमदार खेळी आणि अंतिम फेरीत प्रवेश

माती विभागातील उपांत्य फेरीत महेंद्र गायकवाड आणि विशाल बनकर यांच्यात जोरदार कुस्ती झाली. गायकवाडने उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली.

‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मान

‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकणे प्रत्येक कुस्तीपटूसाठी गौरवाची बाब असते. पृथ्वीराज मोहोळ यांच्या मेहनतीला आणि संघर्षाला अखेर यश आले. त्यांच्या विजयाने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आता पुढील स्पर्धांमध्ये ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कसे करतात, याकडे कुस्तीप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News