अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक केलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘एल्गार आंदोलनात’ दूध उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
दूध उत्पादक शेतक-यांच्या समस्या दिवसागणीक वाढत चालल्या आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसाय शेतक-यांना आधार ठरला असतानाच या व्यवसायाकडेच महाविकास आघाडी सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले

असल्याचा आरोप करुन आ.विखे पाटील म्हणाले की, कोरोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडले आहेत.
राज्यात दूध उत्पादक शेतक-यांच्याही आत्महत्या सुरु झाल्या पण त्याच्याही संवेदना या सरकारला राहीलेल्या नाहीत. कोरोना संकटात दूध उत्पादक शेतक-यांना २५ रुपये हमीभाव देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती.
प्रत्यक्षात या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही, महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतक-यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात भाजपाच्या वतीने दूध उत्पादकांचे आंदोलन झाल्यानंतर सरकार निर्णय घेईल अशी अपेक्षा होती.
परंतू मंत्रीमंडळाच्या दोन बैठका होवूनही दूध उत्पादकांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार कोणताही ठोस निर्णय घेवू शकले नाही याकडे लक्ष वेधून आ.विखे पाटील म्हणाले की, शासनाच्या निर्णया विरोधात जावून सरकारमधील मंत्र्यांच्या दूध संघानीच उत्पादकांना कमी दरात दूध खरेदी करण्याची भूमिका घेवून एकप्रकारे उत्पादकांवर अन्याय केला आहे.
शासनाच्या या निष्क्रीयतेचा निषेध म्हणून राहाता येथे सकाळी १० वा. भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी, दूध संकलन केंद्रचालकांच्या उपस्थितीत हे आंदोलन नगर मनमाड रोडवर स्टेट बॅकेसमोरील विरभद्र दूध उत्पादक संस्थेजवळ आंदोलन करुन दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात येणार असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.
जनावरांच्या खाद्याचे वाढलेले भाव आणि दुसरीकडे दूधाला मिळणारा कमी दर त्यामुळे ग्रामीण भागातील हा शाश्वत व्यवसायही मोडकळीस आणण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारकडुन होत आहे. निद्रीस्त सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने २० जुलै रोजी राज्यभर आंदोलन करुन दूधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव द्यावा,
दूध उत्पादक शेतक-यांना प्रतिलिटर १० रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे अशा मागण्याचे निवेदन दिले होते. या मागण्यांबाबत सरकारने कोणताच निर्णय केला नाही. यामुळेच महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी १ ऑगस्ट २०२० रोजी राज्यभर पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.
गावपातळीवर, तालुका स्तरावर दूध उत्पादक शेतकरी, कार्यकर्त्यांनी १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत सरकारच्या निषेधाचे आंदोलन सोशल डिस्टसिंगचा नियम पाळुन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा