कोपरगाव: माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी आपल्या कारकीर्दीत मंजूर करून आणलेल्या रस्त्यांची मंजुरी आमदार आशुतोष काळे आपणच ते मंजूर करून आणल्याचे खोटेच जनतेला सांगत आहे.
मात्र जनता सुज्ञ आहे. त्यामुळे काळे यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये, अशी परखड टीका विवेक कोल्हे यांनी केली. कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष आयुष्यात आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या आहेत निदान राजकीय आयुष्यात तरी रेघोट्या न मारता स्वकर्तृत्वावर दाखवावे, अशी परखड टीका कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पहिल्या दोन रस्त्याचा समावेश आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यीत २०१८ च्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
मात्र ही कामे आपणच मंजूर केल्याची खोटी माहिती कोपरगावचे लोकप्रतिनिधी देत आहे. परंतु सदर खात्याचे मंत्री जेव्हा पदभार स्वीकारतील तेव्हाच निधी प्राप्त होईल, असे आमदार स्वतःच कबूल करतात.
मग यांनी परस्पर निधी आणला कोठून असा सवालही कोल्हे यांनी केला. कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष आयुष्यात आयत्या पिठावर रेघोट्या मारल्या. निदान राजकीय आयुष्यात तरी रेघोट्या न मारता स्वकर्तृत्वावर जगावे अशी टीका विवेक कोल्हे यांनी केली.
आपल्या निवेदनात कोल्हे यांनी या रस्त्यांची सत्यस्थिती व्यक्त करताना म्हटले आहे कि, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख १० रस्त्यांची सन २०१८ मधेच पत्राद्वारे शासनाकडे मागणी केली.
त्यानुसार राज्य मार्ग क्रमांक ६५ झगडे फाटा तळेगाव ते संगमनेर, राज्य मार्ग ७ सावली विहीर-चासनळी-भरवस फाटा या रस्त्यांचा समावेश २०१८ च्या मंजूर झाल्याचा कागदोपत्री पुरावा आहे.
विद्यमान सरकारच्या काळात अद्याप कोणत्याही मंत्र्यांना खाते वाटप झाले नाही, मग लोकप्रतिनिधींनी कोणाशी व कधी पत्रव्यवहार केला. व रस्त्यांची कामे कोणाकडून मंजूर केले. निधी कोणाकडून आणला, हे सगळे प्रश्न निर्माण होतात. मात्र हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही.
मात्र हे लोकप्रतिनिधींना कळत नाही.हा प्रकार अत्यंत निंदनीय असून ,हे लोकप्रतिनिधीच्या अनुभव शून्यतेमुळे तर घडत नाही, ना असा प्रश्न स्वाभाविकच पडल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घ्यावे का हेच यांना समजू नये यावरुन यांची मानसिकता समोर आली आहे.
एकदा आपण स्वत: केलेल्या पाठपुराव्याने काम मंजूर करावे नंतरच श्रेय घ्यावे.कुठल्याही शासकीय कामास प्रथमतः संबंधीत खात्याची मंजुरी घ्यावी लागते त्यानंतर त्यास प्रशासकीय मान्यता मिळते व त्यानंतर साधारणपणे दीड ते दोन महिन्यांनंतर संबंधीत कामे ही निविदा प्रक्रियेत येते हेही समजू नये यापेक्षा अज्ञान ते दुसरे कोणते?, असा सवालही कोल्हे यांनी केला.
आपण मंजूर न केलेल्या कामाचे श्रेय घेऊन उगाच आयत्या बिळावर नागोबा हे धोरण घेऊन बसू नका.
प्रत्यक्षात कार्यवाही करा मगच श्रेय घ्या. खोटे बोला पण रेटून बोला हा प्रकार बंद करून ज्यावेळेस आपण काम मंजूर आणाल त्याच वेळेस प्रसारमाध्यमांना द्या, असे आवाहनही औद्योगिक वसाहत चेअरमन विवेक कोल्हे यांनी आमदार काळे यांना केले. कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांची टीका