नेवासे :- भाजपला मताचा अधिकार मान्य नाही, त्यांना हुकूमशाही हवी आहे. वारेमाप दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती त्यांच्याकडून झाली नाही.
त्यामुळे आता मोदी नकोच असाच सर्वांचा निर्णय झाला आहे, असे आमदार बाळासाहेब थोरात यांनी रविवारी सांगितले.
काँग्रेसने अनेकदा सत्तापदे दिल्यानंतरही बालहट्ट पुरवण्यासाठी कोलांटउड्या मारणे हे चुकीचे वाटत नाही का? असे कुठे राजकारण असते का? असा सवालही त्यांनी विखेंना केला.
काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांसह क्रांतिकारी शेतकरी पक्षाची सभा नेवासेफाट्यावर झाली.
माजी आमदार संभाजीराव फाटके अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी माजी आमदार नरेंद्र घुले, संभाजीराव फाटके, पांडुरंग अभंग, भानुदास मुरकुटे व विठ्ठलराव लंघे, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,
अशोक कारखान्याचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, हरिभाऊ तुवर, राजेंद्र रायकर, संदीप वर्पे आदींची भाषणे झाली.
प्रास्तविक गणेश गव्हाणे यांनी केले, तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले यांनी स्वागत केले. भाजपला चातुर्वण्य व्यवस्था आणायची आहे. नोटबंदीने सर्वाधिक नुकसान शेतकरी वर्गाचेच झाले, असे थोरात म्हणाले.