अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अकोले राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बोलविलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी राडा घातल्याने निवडीविनाच हा मेळावा आटोपता घ्यावा लागला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आ. डॉ. लहामटे यांनी गचांडी पकडल्याने सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अवाक् झाले.
यावेळी आ. डॉ. लहामटे यांनी अक्षरशः त्या कार्यकर्त्यावर शिव्याची लाखोली वाहल्याने अनेकांना आपले कान बंद करण्याची वेळ यावेळी आली होती. माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून तालुक्यात राष्ट्रवादीत तालुकाध्यक्षांसह अनेक पदे रिक्त होती.
रिक्तपदाच्या निवडीसाठी आज पक्ष निरीक्षक व पक्षाचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अजित कदम, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या उपस्थितीत मेळावा व इच्छुकांच्या मुलाखती घेवून लगेच एकमताने निवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
त्यानुसार अकोले येथील मंगल कार्यालयात हा मेळावा सुरू झाला. अशोक भांगरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता दिपक वैद्य हा प्रवेशद्वारजवळ उभा राहून या मेळाव्यासाठी येणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांचे स्वागत करीत होता. त्यावेळी इच्छुकांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या होत्या. त्यावेळी आ. डॉ. लहामटे यांनी वैद्य याला प्रवेशद्वारासमोर कार्यकर्त्यांचे स्वागत करतांना पाहिल्यानंतर अचानक ते त्यांच्यावर धावून गेले.
तू येथे काय करतोस, तू तर विधानसभेत भाजपचे काम केले आहे. असे म्हणून वैद्य यांची अक्षरशः गंचाडी पकडली. व त्याला शिव्या देण्यास सुरवात केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रवेशद्वारासमोर कसा गोंधळ सुरू आहे म्हणून पक्ष निरीक्षकांसह कार्यकर्ते व नेते बाहेर आहे आले. तर आ. डॉ. लहामटे हे वैद्य यांना शिव्या देत होते.
आ. डॉ. लहामटे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ते आपल्याच तोऱ्यात असल्याने अनेकांचा नाईलाच झाला. विशेष म्हणजे अशोक भांगरे हे देखील गप्प बसून हा तमाशा पहात होते. अखेर वर्पे यांनी आ. डॉ. लहामटे यांना बाजूला नेले. या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com