अहमदनगर : माजी महापौर व शिवसेनेचे स्थानिक नेते भगवान फुलसौंदर यांच्यावर दाखल गुन्हा खोटा असून, याबाबत योग्य ती चौकशी करावी. फुलसौंदर यांच्यावर अन्याय होणार नाही, याची पोलिस प्रशासनाने दक्षता घेण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन आमदार जगताप यांनी पोलिस अधीक्षक यांना दिले आहे. माजी महापौर भगवान फुलसौंदर व इतर आठ जणांवर गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी जगताप यांनी पोलिस अधीक्षक यांना रविवारी निवेदन दिले आहे.
माजी महापौर फुलसौंदर व इतरांवर जागेच्या वादातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलसौंदर हे राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करतात. त्यांचे समाजात चांगले स्थान आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची योग्य ती चौकशी करावी व त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याबाबत विचार करून पोलिस प्रशासनाने दक्षता घ्यावी.
तसेच यापुढे एखाद्या राजकीय, सामाजिक, व्यापारी, प्रतिष्ठित व्यक्ती यांची कारकीर्द संपरविण्याचा दृष्टीने असले प्रकार घडविण्याचे शक्यताही नाकारता येत नाही, असे जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.