अहमदनगर :- सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत जनतेमध्ये राहून मतदार संघात विविध विकास कामांबरोबरच सर्वसामान्य लोेकांचे प्रश्न सोडविले.
त्यांच्या सुख:दु:खात बरोबर राहिल्याने गेल्या 25 वर्षापासून आमदारकी ही फक्त जनसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पणाला लावली.

यामुळे मला राजकारणातून संपविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील विरोधक एकत्र येत परिवर्तनाची हाक देत आहेत. मला संपविण्यासाठी महाराष्ट्रातील पुढारी जरी एकत्र आले
तरीही जिल्ह्यातील जनतेच्या पाठबळावरच मी आमदार राहणार आहे, तेव्हा विरोधकांनी काळजी करु नये, असे प्रतिपादन आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
बुर्हाणनगर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या औरंबाबाद रोडवरील तपोवनजवळ असलेल्या शिवाजीनगरमध्ये 76 लाख रु. खर्च केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन आ.कर्डिले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, रेवणनाथ चोभे, संचालक संदिप कर्डिले, दिलीप भालसिंग, बबन आव्हाड, कानिफनाथ कासार, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संभाजी पवार, बुर्हाणनगरचे उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, पं.स.सदस्य राजू भिंगारदिवे, दत्ता तापकिरे, ग्रामसेवक रामदास दळवी, किशोर कर्डिले, कानिफनाथ कर्डिले आदि उपस्थित होते.
आ.कर्डिले पुढे म्हणाले, विरोधकांना आमदारकीचे स्वप्न पडू लागली आहेत. निवडणुका जवळ आल्यावरच त्यांना मतदारांची आठवण होते.जेऊर येथील परिवर्तन यात्रेत सर्व विरोधक एकत्र आले.
येत्या निवडणुकीत परिवर्तनाची हाक देत असले तरी मला माझ्या जनतेवर विश्वास आहे.जनतेच्या प्रश्नांसाठी मी आमदारीकीचा उपयोग केला. मंत्रीपद नसले तरी मी मंत्र्यापेक्षा जास्त निधी आमदारकीच्या जोरावर मतदारसंघात आणला.
राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर सारख्या गावात गेल्या 25 वर्षात रस्ता झाला नाही, तो मी केला. हा मतदार संघ नवखा असूनही पहिल्या वेळेस 11 हजार मतांनी, दुसर्या वेळेस 46 हजार मतांनी मी निवडून आलो
येत्या निवडणुकीत जनतेच्या पाठबळावर 1 लाख मतांनी निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. जनसामान्य माणूस माझ्या बरोबर आहे, जो पर्यंत जनतेच्या मला पाठिंबा आहे, तोपर्यंत माझ्या आमदारकीला कुठलाच धोका नाही, असे आ.कर्डिले यांनी स्पष्ट केले.
प्रास्तविकात या भागातील डॉ.विकास वाळूंजकर यांनी आ.कर्डिले यांच्या कार्याची प्रशंसा केली. रस्ते, लाईट, पाणी या प्रश्नांचा आ.कर्डिले यांनी स्वत: पाठपुरावा करुन तो मार्गी लावला सभामंडपामुळे धार्मिक उत्सव साजरा करण्याचा वेगळा आनंद आम्हाला मिळेल, असे सांगितले.