अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : स्वत:च्या पोटच्या सहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडवून तिचा खून केल्याप्रकरणी मयत सुमन उर्फ मीना गणेश आढाव, हिच्या विरोधात बेलवंडी पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वत:च्या मुलीच्याच खून प्रकरणी मृत्यू पावलेल्या आई विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्याची ही विचित्र घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील कोरेगव्हाण येथे घडली आहे. परंतु आरोपी आईचा मृत्यू झाल्यामुळे आता शिक्षा कुणाला द्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
घटनेबाबत सविस्तर असे की, कोरेगव्हाण येथील सुमन उर्फ मीना आढाव यांचा माहेराहून ५० हजार रुपये आणावेत. यासाठी सासरा व पती यांच्याकडून शारीरिक मानसिक छळ होत होता.
त्या वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून सुमन यांनी त्यांची सहा वर्षीय मुलगी अनुजा हिला सोबत घेऊन दि.५ जानेवारी रोजी त्यांच्या घरामागे असणाऱ्या विहिरीत उडी घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवली.
सदर घटनेबाबत मयत सुमन यांच्या भावाच्या फिर्यादीवरून सुमन यांचा पती व सासरा या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला होता परंतु मयत सुमन यांची सहा वर्षीय मुलगी अनुजा ही अल्पवयीन, अज्ञान असल्यामुळे सुमन यांनी जबरदस्तीने अनुजा हिला पाण्यात बुडवून खून केल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे बेलवंडी पोलीस निरीक्षक अरवींद माने यांच्या फिर्यादीवरून सहा वर्षीय अनुजाच्या खून प्रकरणी तिची आई मयत सुमन उर्फ मीना आढाव हिच्याविरोधात दि.१०रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु मुलीचा जीव घेणारी आरोपी आई मयत झाल्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने हे प्रकरण निकाली निघाले आहे.
हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !