नेवासे तालुक्याच्या विकासासाठी वीज, रस्ते व पाणी योजनांना प्राधान्य दिल्याने येत्या निवडणुकीतही भाजपचाच आमदार निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. नेवासे ते नारायणवाडी या सुमारे साडेपाच कोटी खर्चाच्या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामाचा मुरकुटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
विरोधी आमदार निवडून दिला असता, तर बिहारच्या वाटेवर नेवासे तालुका गेला असता. गुंडगिरी व दादागिरी वाढली असती. आतापर्यंत बाराशे कोटींचा निधी आणला, असे सांगून माजी आमदाराने त्यांच्या पाच वर्षांत आणलेल्या निधीचे स्पष्टीकरण द्यावे, असे आमदार बाळासाहेब मुरकुटे गडाखांचे नाव न घेता म्हणाले.
त्यांनी पाच वर्षांत काय दिवे लावले याचे आत्मपरीक्षण करावे. तालुक्यातील नुकसान टाळण्यासाठी जनता त्यांना कधीही स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले.