कांद्याला वीस हजार भाव बळीराजा सुखावला

Ahmednagarlive24
Published:

नेवासे: तालुक्यातील घोडेगाव उपबाजारात रविवारी जुन्या गावरान कांद्याला वीस हजार, तर नवीन लाल कांद्याला दोन ते बारा हजार क्विंटल दर मिळाला. नवीन कांद्याची साडेपंधरा हजार गोण्या आवक झाली.

बाजारात साडेतीन कोटींची उलाढाल झाली आहे. लिलावातील पारदर्शकता, समितीचे नियंत्रण व आमदार शंकरराव गडाखांचे लक्ष असल्याने या बाजार समितीत जिल्ह्यात सर्वाधिक भाव मिळतो व लगेचच रक्कम अदा होत असल्याने जिल्ह्याबाहेरुन आवक वाढत आहे.

रविवारी सकाळी अकरा वाजता आवक सुरू झाली. नवीन कांद्याच्या १५ हजार ६३७ ,तर जुन्या कांद्याच्या ४४२ गोण्या आल्या. एक नंबर जुन्या कांद्यास १४ ते २० हजारांचा भाव मिळाला.

दोन नंबरला ९००० ते ११ हजार रुपये, तर तीन नंबरचा कांदा २५०० ते ६५०० प्रमाणे विकला गेला. नवीन एक नंबर लाल कांद्यास आठ ते बारा हजारांचा भाव मिळाला.

संपूर्ण बाजार शेतकरी, व्यापारी, आडतदार व वाहनांनी हाऊसफुल्ल झाला होता. खुपटी येथील ज्ञानेश्वर चौधरी यांच्या २९ गोण्या गावरान कांद्यास वीस हजारांचा भाव मिळून सव्वातीन लाख रुपयांची पट्टी मिळाली.

आमदार गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली येथे २००३ मध्ये कांद्याचे लिलाव सुरु झाले. पारदर्शक पध्दतीमुळे राज्यभरातून व्यापारी व शेतकरी येथे येतात.

कांद्याची पट्टी लगेचच दिली जाते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी दिली. भाव पाडण्याची भीती शहरी भागातील वाढत्या दडपणाने केंद्र सरकार भाव पाडण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी निवडक मोठा झालेला कांदा काढून विक्रीसाठी आणत आहेत.

आज महिन्याने काढणीस असलेला कच्चा कांदा मोठ्या प्रमाणात लिलावास आला होता, असे आडत व्यापारी संतोष वाघ यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment