हत्याकांडाच्या तपासाला तब्बल १७ वर्षांनंतर यश,१४ वर्षांत कुटुंबातील ६ जणांची सायनाइड देऊन हत्या!

Ahmednagarlive24
Published:

कोझिकोड : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील एका कुटुंबातील ६ जणांच्या गूढ हत्याकांडाच्या पोलीस तपासाला तब्बल १७ वर्षांनंतर यश आले. एका महिलेने १४ वर्षांच्या कालावधीत अतिशय शांत डोक्याने घरातील ६ सदस्यांचा सायनाइड देऊन काटा काढला होता.

एखाद्या रहस्यमयी चित्रपटातील कथानक वाटेल, असा या गूढ प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.. कोझिकोडमध्ये राहणाऱ्या ४७ वर्षीय जॉली थॉमस नामक महिलेवर २००२ ते २०१६ सालादरम्यानच्या कालावधीत कुटुंबातील ६ जणांना सायनाइड हे जहाल विष देऊन मारल्याचा आरोप आहे.

सर्वात प्रथम जॉलीची सासू अनम्मा थॉमसचा २००२ मध्ये मृत्यू झाला होता. यानंतर तिचे सासरे टॉम थॉमस २००८ मध्ये गूढ स्थितीत दगावले होते. जॉलीचे पती रॉयचा मृत्यू २०११ मध्ये झाला होता. २०१४ मध्ये रॉयच्या मामाचाही असाच गूढ मृत्यू झाला. हे मृत्यूसत्र एवढ्यावरच न थांबता, दोन वर्षांनंतर एका महिला नातेवाइकासह तिचे वर्षभराचे बाळही अशाप्रकारे मृत्युमुखी पडले होते.

या सर्वांचा मृत्यू जेवणानंतर झाला होता. मात्र, या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांना काहीही ठोस पुरावे सापडत नव्हते. अखेर प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूवेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या जॉलीकडे तपासाचे चक्र वळविण्यात आले. तपासादरम्यान या सर्व हत्या जॉलीने केल्याचा उलगडा झाला. विषयुक्त जेवण देऊन जॉलीने शांत डोक्याने एका-एका सदस्याचा जीव घेतला.

दोन महिन्यांच्या प्रदीर्घ तपासानंतर पोलिसांनी जॉली, तिचा मित्र एम. मॅथ्यू व दागिन्याचे काम करणाऱ्या प्राजू कुमारला अटक केली आहे. तिच्या दोन मित्रांनी तिला सायनाइड उपलब्ध करून दिले होते. विवाहबाह्य संबंध व संपत्तीच्या लालसेपोटी तिने हे हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment