गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या वतीने लष्करी व पोलीस अधिकार्‍यांचा सन्मान

Published on -

अहमदनगर (प्रतिनिधी)- राजौरी (जम्मू) येथे देश सेवेचे कर्तव्य बजावणारे सुभेदार विनोदकुमार चौहान आणि दामिनी पथकाच्या माध्यमातून युवतींच्या संरक्षणासाठी धाऊन येणार्‍या सहा.पो.नि. कल्पना चव्हाण यांचा गॅलॅक्सी नॅशनल स्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सुभेदार चौहान म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम रुजविल्यास सशक्त भारत घडणार आहे. विविध सामाजिक कार्यात योगदान देणे ही समाजसेवाच आहे. उच्चशिक्षित होऊन भावी पिढीचे विद्यार्थी देशाला महासत्ता करणार आहेत. मुलांमधील असलेले देशभक्ती पाहून आनंद होत असल्याची भावना व्यक्त करुन, शाळेत राबविण्यात येणार्‍या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. 

कल्पना चव्हाण यांनी मुलींना न घाबरता निर्भयपणे समाजात वावरण्याचे सांगून, मुली व महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या दामिनी पथकाची माहिती दिली. तर शाळेतील महिला पालक व मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे देण्याकरिता विशेष वर्ग राबविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आश्‍वासन दिले. जिल्हास्तरीय अ‍ॅरोबिक्स व देशभक्तीवर समूह गीत गायन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणारे शालेय विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

फाऊंडेशनचे सचिव अ‍ॅड.सतीश भोपे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. स्कूलच्या संचालिका देविका देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. उषा देशमुख म्हणाल्या की, शैक्षणिक ज्ञान देताना संस्कारासह देशभक्तीची मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांच्यापुढे चांगले पाहुणे आणून त्यांना प्रोत्साहित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्या आंतरप्रीत धुप्पड यांनी आभार मानले. यावेळी संचालक सम्राट देशमुख, अनिता गागरे आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News