अहमदनगर (प्रतिनिधी)- सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावर ओढवलेल्या जलप्रलयानंतर त्यांना आधार देण्यासाठी अवघा महाराष्ट्र एकवटला आहे. गरीब असो किंवा श्रीमंत लहान असो किंवा मोठे सर्वजन आपल्या परीने पुरग्रस्तांसाठी मदत पाठवित आहे.
हीच सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैश्यासह घरोघरी जाऊन सुमारे 31 हजार रु. चा मदतनिधी जमा केला. पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांनी जमा केलेला 31 हजार रु. चा मदतनिधी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे निरीक्षक संजय नागपुरे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे, प्राचार्य सुभाष ठुबे, मुख्याध्यापक शिवाजी लंके, राजनारायण पांडूळे, बाबासाहेब शिंदे आदींसह शिक्षक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमधून स्वयंस्फुर्तीने विद्यार्थी मदत निधी जमा करीत आहे. जमा झालेली मदतनिधी रयत शिक्षण संस्था कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी देणार आहे.