संगमनेर तालुक्यात भूकंपसदृश्य धक्के

Published on -

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील बोटा माळवाडी परिसरात शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री भूकंपसदृश्य सौम्य धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही असे धक्के वारंवार बसलेले आहेत.

गेल्या काही वर्षापासून बोटा परिसरासह आजूबाजूच्या गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत. तर काही धक्के मोठे बसलेले असल्याने त्या धक्क्यांची नोंदही नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापक यंत्रावर झाली आहे. 

त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी बोटा परिसरात येवून नागरिकांना घाबरून जावू नका, असे आवाहनही त्यावेळी केले होते. कालांतराने धक्के बसण्याचेही बंद झाले होते. मात्र, लोकांच्या मनामधून भीती जात नव्हती.

माळवाडीचे काही लोक घराबाहेर ताडपत्रीचे तंबू ठोकून रात्रीच्या वेळी त्यामध्ये झोपत. आता पुन्हा भूकंपसदृश्य धक्के बसण्यास सुरुवात झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे..

शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून हे धक्के बसण्यास सुरुवात झाली होती. रात्री पुन्हा दोन सौम्य धक्के बसले होते. त्यामुळे काही नागरिकांना धक्के जाणवले, तर काहींना जाणवले नाही.

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोटा गावचे सरपंच विकास शेळके यांनी याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe