मानवी शरीर इहलोकीचा निरोप घेतल्यानंतरही जवळपास वर्षभर हालचाल करत असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या एका शास्त्रज्ञाने सप्रमाण सिद्ध केला आहे. हे संशोधन वैद्यकीय व कायदा अंमलबजावणी संस्थांसाठी मोलाचे ठरण्याची शक्यता आहे.
एका प्रेताचे जवळपास १७ महिने सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर ॲलिसन विल्सन यांनी मानवी शरीर मृत्यूनंतरही चिरविश्रांती घेत नसल्याचे सिद्ध केले आहे. प्रस्तुत प्रकरणात मृतदेहाजवळ असणारे हात कालांतराने बाहेरच्या दिशेला वळल्याचे दिसून आले.

मृत्यूनंतर अस्थिबंधन शुष्क व स्नायूबंध गुळगुळीत होतात. त्यामुळे ही प्रक्रिया शरीराचे विघटन (कुजणे) होण्याशी संबंधित असावी, असे आम्हाला वाटते, असे विल्सन यांनी म्हटले आहे.
यासंबंधीची प्रक्रिया विस्तृतपणे समजून घेण्यासाठी विल्सन यांनी केर्न्स ते सिडनी असा दरमहा ३ तास विमान प्रवास केला. त्यांचा ‘ऑब्जेक्ट’ (मृतदेह) दक्षिण गोलार्धात जतन करण्यात आलेल्या १७ प्रेतांपैकी एक आहे.