नेवासे :- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या चक्का जाम आंदोलनप्रकरणी नेवासे न्यायालयाने क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख, शंकरराव गडाख यांच्याविरोधात पकड वॉरंट काढले आहे.
त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश सोनई पोलिस ठाण्याला बजावले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलने आणि शंकरराव गडाख हे तालुक्यात जणू समीकरणच बनले आहे.

पाटपाणी, कर्जमाफी, हमीभाव, कांदा, कापूस, दूध दर, बॅकवॉटर, वीज, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावरुन त्यांनी नेहमीच आक्रमक आणि निर्णायक भूमिका घेतल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवरुन त्यांनी केलेल्या संयमी आंदोलनांची थेट राज्य पातळीवर दखल घेतली गेली.
सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असतानाही त्यांच्यावर आंदोलनप्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले होते. त्यांचे वडाळा बहिरोबा येथील रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन सरकारसाठी डोकेदुखी ठरले होते.
याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा आधार घेऊन त्यांच्याभोवती फास आवळण्यास सुरुवात केल्याकडे सांगितले जात आहे. या घटनाक्रमांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.