अकोले :- तालुक्यातील देवठाण येथील आढळा विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह रविवारी सायंकाळी नदीपात्रातील विहिरीत आढळला. सौरभ मच्छिंद्र सोनवणे (वय १७) असं त्याचं नाव आहे.
१२ फेब्रुवारीला तो बेपत्ता झाला होता. शिक्षिका रागावल्यानं मुलानं आत्महत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला असून, त्यांच्या तक्रारीवरून शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सौरभला दहावीच्या सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले होते. त्यामुळे पालकांना घेऊन आल्याशिवाय वर्गात बसून दिले जाणार नाही असे शिक्षिकांनी सांगितल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सौरभ मंगळवारी दुपारच्या सुट्टीनंतर शाळेतून निघून गेला. दप्तर शाळेतच होते. पाच वाजता त्याच्या वडिलांना तो शाळेत नसल्याचे सांगण्यात आले. शिक्षक, पालक आणि वर्गातील विद्यार्थ्यांनी परिसरात शोध घेतला; पण तो सापडला नाही.
बुधवारी त्याचे वडील मच्छिंद्र सोनवणे यांच्या तक्रारीवरून अकोले पोलिसांनी सौरभ बेपत्ता झाल्याची नोंद केली. रविवारी सायंकाळी सात वाजता आढळा नदीपात्रातील विहिरीत सौरभचा मृतदेह सापडला.