शनिशिंगणापूर : शनिशिंगणापूर दोन कोटींच्या अपहारप्रकरणी जामीन फेटाळला, तरी व्यंकटेश पतसंस्थेच्या संचालकांवर कारवाई करण्यास आर्थिक गुन्हे शाखा आठ महिन्यांपासून टाळाटाळ करत असल्याने २२ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.
नेवासे तालुक्यातील सोनई येथील या पतसंस्थेतील संचालक व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून अपहार केला. अध्यक्ष व संचालकांवर गुन्हे दाखल झाले. अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला, तरी आरोपींना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला अपयश आले.

एक वर्ष झाले, तरी ठेवीदारांना पैसे मिळालेले नाहीत. तपासी अधिकाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे असून मुख्यमंत्री, गृहमंत्री, सहकार मंत्री, पंतप्रधान कार्यालय व संबंधित विभागांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. सर्व आरोपी आपापले व्यवहार करताना दिसत असून, या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली जात नसल्याने ठेवीदारांत संतापाची लाट उसळली आहे.
ठेवीदारांचे पैसे परत करू, असे संचालक म्हणतात. तथापि, पैसे परत मिळत नसल्याने दोषी संचालकांवर कारवाई करावी. ठेवीची मिळत नसल्याने आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे, असे ठेवीदार दत्तात्रय जाधव यांनी सांगितले.