मानव सतत झाडे-रोपट्यांचा आपल्या सुखसुविधांसाठी वापर करत आला आहे. कागदनिर्मितीपासून फर्निचरपर्यंत सगळ्यांसाठी तो झाडांवर अवलंबून आहे. मात्र नेहमीच असे होत नाही. कधीकधी झाडेझुडपेच मानवाला नुकसान पोहोचवितात.
‘होगहीड’ नावाचे गाजरगवत प्रजातीचे रोपटे असेच खतरनाक आहे. ते फारसे मोठे नसते, पण कोब्रा सापाएवढे घातक असते. होगवीड अतिशय विषारी रोपटे समजले जाते. ‘किलर ट्री’ नावानेही ते प्रसिद्ध आहे. या खतरनाक, पण दिसायला अतिशय सुंदर असलेल्या रोपट्याचे शास्त्रीय नाव ‘हेरकिलम मेंटागेजिएनम’ आहे.

होगवीड रोपटे न्यूयॉर्क, पेन्सिलवेनिया, ओहियो, मेरीलँड, वॉशिंग्टन, मिशिगन व हॅम्पशायरमध्ये आढळून येते. त्याला नुसता स्पर्श केला तरी हातावर पुरळ वा फोड येतात. हे पुरळ व फोडांमध्ये पाणी असते. कधीकधी त्याच्या स्पर्शाचा ४८ तासांमध्ये त्याचा एवढा खतरनाक परिणाम होतो की, त्यातून बरे होण्यासाठी लोकांना अनेक वर्षे लागतात.
एवढेच नाही तर या रोपट्याच्या स्पर्शामुळे डोळ्यांची दृष्टीही हिरावली जाते, असे सांगतात. डॉक्टरांच्या मते, या रोपट्यामुळे होणारे शारीरिक नुकसान भरून काढण्यासाठी अजूनतरी कोणतेही प्रभावी औषध बनलेले नाही.
या रोपट्यात सेंसटाइजिंग फुरानोकौमारिन्स नामक रसायन आढळून येते. ते सापाच्या विषापेक्षाही जास्त घातक समजले जाते. या झाडाचा स्पर्श झाल्यानंतर उन्हात गेल्यास आणखी गंभीर परिणाम होतात.