अहमदनगर :- जगदगुरू तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे नाठाळांना किती समजून सांगितले तरी त्यांना समजत नाही, अशा वेळेला कठोर भूमिका घेऊनच स्पष्ट बोलूनच त्यांना वठणीवर आणावे लागते. प्रचारादरम्यान आपण सर्वसामान्यांचे कष्टकर्यांचे प्रश्न उपस्थित केले.
हे काही नाठाळांना रुचले नाही व आपल्याला विरोध करण्यासाठी ही मंडळी आरोप करत आहेत व विघ्न निर्माण करत आहेत. परंतु आपल्याला संघर्षाचे बाळकडू मिळालेले आहे. त्यामुळे मी या नाठाळांना घाबरत नाही, असा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

बोल्हेगाव येथील स्नेहमेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विखे यांनी बंद पडलेल्या कंपन्या, कारखान्यांचा बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, नवीन कारखाने यायला तयार नाहीत. त्यासाठी उद्योगांना आश्वासित करण्याची गरज आहे , ते एक खासदार करू शकतो.
मात्र, काही नाठाळ मंडळींशी वेळप्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागेल व ती घेण्याची धमक आपल्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे,धनंजय जाधव उपस्थित होते.
डॉ. विखे पुढे म्हणाले की, माझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची उमेदवारी आहे व मी म्हणजे सर्वसामान्यांचा आरसा आहे. वेळप्रसंगी योग्य त्या व्यासपीठावर योग्य ती भूमिका घेऊन सर्वसामान्यांना न्याय देऊन वर्षानुवर्ष असलेले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी दिले.