अहमदनगर :- मी जर प्रत्येक घडामोडीकडे बारकाईने लक्ष दिलेे असते, तर गाडी राहुरीच्या पुढेच आली नसती. बरं आता आलीच आहे, तर परत पाठवून दण्याचे काम संग्राम जगताप करणार आहे.
गाडी कोणत्याही बॅगा घेऊन येऊ द्या, त्याचाही बंदोबस्त आपण करू, असा टोला राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता लगावला.
राष्ट्रवादीचा मेळावा शुक्रवारी राष्ट्रवादी भवनात झाला. माजी मंत्री मधुकर पिचड अध्यक्षस्थानी होते.
यावेळी जिल्ह्याचे प्रभारी आमदार दिलीप वळसे, आमदार अरुण जगताप, राहुल जगताप व वैभव पिचड, निरीक्षक अंकुश काकडे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, दादा कळमकर, माजी जि. प. अध्यक्ष मंजूषा गुंड, अड. शारदा लगड, घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, सर्वांना बरोबर घेत आपण निवडणूक लढवणार आहोत. ही निवडणूक स्थानिक प्रश्नांवर असून ही तुमची-आमची निवडणूक आहे.
आपला प्रचार नेता, सदस्यांपासून सामान्य कार्यकर्ता करणार आहे. दक्षिणेची जबाबदारी दिली, तर तेथे संग्राम जगताप कायम फिरताना दिसेल, हेलिकॉप्टरमधून उतरलेलो दिसणार नाही.
आम्हीही कमी नाही. एक नाही १० इंपोर्टेड गाड्या आहेत. दुसऱ्यांच्या नावावर नाहीत. जे आहे ते आहेच, त्याच पद्धतीने राहील.
वळसे म्हणाले, पवारांची दिल्लीतील शक्ती वाढावी, यासाठी त्यांच्या किंवा महाआघाडीच्या बाजूने उभा राहणारा खासदार पाठवायचा आहे.
समोरचे जे उमेदवार आहेत, त्यांच्याबाबत वर्तमानपत्रांतून वाचले. कितीही साधन सामग्री अन् काहीही असले, तरी आपण सगळेजण एकत्र आलो, तर यश मिळवू शकतो, याची मला खात्री आहे.
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार मदत करणार आहेत. भविष्यात या मतदारसंघात आपला आमदार निवडून येईल अशी परिस्थिती आहे.
श्रीगोंद्याला नागवडेंना तिकिट द्यायचे होते, पण काही कारणांमुळे जमले नाही. ते जमले नसले, तर आपण चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
शेवगाव-पाथर्डी, पारनेरमध्येही अडचण नाही. नीलेश लंके आल्यामुळे पारनेरमध्ये आणखी शक्ती वाढली आहे.