अकोले :- बारावीमध्ये शिकत असलेल्या सौरभ तात्यासाहेब मंडलिक (वय १८) या विद्याथ्र्याने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, अकोले शहरातील सारडा पेट्रेलपंपाच्या मागे डॉ.मंडलिक हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर सौरभ याने स्लॅबच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असल्याने त्याने ज्या खोलीत आत्महत्या केली. तिथे सर्व पुस्तके, वह्या, नोटस् अस्तव्यस्त पडलेल्या होत्या. मॉर्डन हायस्कूल अकोले येथे विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये तो शिकत होता. सध्या त्याची परीक्षा सुरू होती. त्याचे वडिल शिक्षक असून चुलते डॉक्टर आहेत.
त्याला आई, वडिल, बहिण असून तो अकोल्यात डॉ. मंडलिक यांच्याकडे राहत होता. घरची सर्व मंडळी लग्नासाठी बाहेर गेली होती. सौरभ दुपारपासून एकटाच घरी होता. तो दुपारपासून फोन उचलत नव्हता. रात्री नऊ वाजता ही मंडळी घरी आल्यानंतर ही बाब लक्षात आली.
याबाबत अकोले पोलिसांना समजताच प्रभारी पोलीस निरीक्षक काळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर सौरभचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.