विरोधकांनी धमकावू नये, आम्हीही कारखाना काढू…

Ahmednagarlive24
Published:

नेवासे :- नेवाशात आघाडीचे चिन्हच गोठवले गेले. त्यामुळे लढाई कोणाशी हेच समजत नाही. पराभूत मानसिकतेतून उभ्या राहिलेले विरोधकांनी धमक्यांचे राजकारण करू नये. आम्ही धमक असलेले नेते आहोत. ठरवले तर साखर कारखाना काढू शकतो, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नम्रतेने जो जय हरी म्हणेल त्यालाच साथ द्या, असे आवाहन शुक्रवारी केले.

भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर खासदार सुजय विखे व सदाशिव लोखंडे, आमदार शिवाजी कर्डिले, अभय आगरकर, नितीन दिनकर, युनायटेड रिपब्लिक पक्षाचे अशोक गायकवाड, उदयकुमार बल्लाळ, सरपंच राजेंद्र देसारडा, शेतकरी संघटनेचे अंबादास कोरडे, सचिन तांबे, पूजा लष्करे, तालुकाध्यक्ष माउली पेचे, सेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, बापूसाहेब शेटे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात आमदार मुरकुटे यांनी कामाचा आढावा सादर करत घाटमाथ्यावरील पाणी वळवणे, बीड-परळी रेल्वेमार्ग, मिनी एमआयडीसी, तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण, तसेच ऊसगाळपात शेतकऱ्यांची होणारी अडवणूक हे प्रश्न मांडले.

त्याला अनुषंगून मुख्यमंत्री म्हणाले, घाटमाथ्यावरील पाणी वळवण्यासाठी निधी उभा केला आहे. जल आराखडा तयार आहे. त्यामुळे नगर जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आहे. पुढील पाच वर्षे दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधक धमकावण्याचे राजकारण करत असतील तर ते चालणार नाही.

आम्ही शेतकऱ्यांसाठी नवा कारखाना उभारू शकतो. नेवासे तीर्थक्षेत्र विकास व १०० कोटींचा सर्वांगीण विकास आराखडा उच्चस्तरीय समितीकडे आला आहे. निवडणूक होताच तो मान्य होणार असल्याने परिसराचा विकास होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment