अहमदनगर :- खोट्या सह्यांद्वारे धनादेशाचा गैरवापर करुन शहर सहकारी बँकेच्या माळीवाडा शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून खात्यातून बारा लाख रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची तक्रार खातेधारक असलेले कुणाल अॅण्ड सन्सचे संचालक महेश कचरे यांनी शनिवार दि.2 मार्च रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला केली.
शहर बँकेने डॉ.निलेश शेळके यांना दिलेले 17 कोटी रुपयाचे बोगस कर्जप्रकरण चांगलेच गाजले असताना या प्रकरणाने बँकेची आनखी डोकेदुखी वाढणार आहे. शहर सहकारी बँकेच्या माळीवाडा शाखेत महेश कचरे यांच्या मालकीचे कुणाल अॅण्ड सन्स या नावाने खाते आहे.
त्यांनी पाथर्डी येथील शेतजमीन यश चायनीज पॉईंटचे संचालक योगेश झुंगे यांना विकली. त्यापोटी त्यांनी कचरे यांना 6 लाख रुपयाचे दोन चेक दिले होते. मात्र काही अडचणीमुळे सदर चेक बँकेत न टाकण्याचे सांगितले.
झुंगे यांनी यश चायनीज पॉईंट या खात्यावरून दोनदा 6 लाख प्रमाणे कचरे यांच्या खात्यात एकूण 12 लाख रुपयाची रक्कम वर्ग केली.
पैसे मिळाल्याची खात्री पटल्याने कचरे यांनी 6 लाख रुपयाचे दोन चेक झुंगे यांना परत केले. कचरे खात्यात जमा असलेले पैसे काढण्यासाठी शहर बँकेच्या माळीवाडा शाखेत जाऊन चेकबुकची मागणी केली.
मात्र 9 जानेवारी रोजीच चेकबुक देण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत शंका निर्माण झाल्याने बँकेच्या अधिकार्याकडे स्टेटमेंट ची मागणी केली.
याच्यावरून 19 जानेवारी व 22 जानेवारी रोजी सहा-सहा लाख प्रमाणे एकूण बारा लाख रुपये काढण्यात आली.
चेक बुक कोणत्या व्यक्तीने नेले याबाबत माहिती घेण्याकरिता 25 फेब्रुवारी रोजी शहर बँकेच्या नवीपेठ येथील मुख्य शाखेत गेले असता चेक बुक इशू रजिस्टर वर खोटी सही असल्याचे उघडकीस आले आहे.
बँकेचे अधिकारी व कर्मचार्यांनी संगणमत करून खात्यावरील रक्कम काढल्याचा आरोप तक्रार अर्जात कचरे यांनी केला आहे.
याप्रकरणी शहर बँकेच्या मुख्य शाखेत दाद मागण्यास गेलो असता कर्मचार्यांनी दमदाटी करून हाकलून लावण्याचे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.