ग्रामस्थांचा विधानसभा मतदानावरही बहिष्कार

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील व अतिदुर्गम भागात असलेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांना वर्षानुवर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकल्यानंतर आता संतप्त ग्रामस्थांनी सोमवार दि. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. यावेळी ग्रामस्थांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार. बहिष्कार.

आमचा रस्ता झालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजीही केली. आजही गाळ तुडवत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना याच रस्त्याने ये-जा करावी लागत आहे.

भोजदरी गावांतर्गत असलेल्या उंच डोंगरावर पेमरेवाडी वसलेली असून, आजही पेमरेवाडी शासनाच्या विविध विकास कामांपासून कोसो दूर आहे. जवळपास चारशे ते पाचशे लोकसंख्या या वाडीची आहे.

वर्षानुवर्षांपासून पेमरेवाडी ते पेमरेवाडी फाटा या रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असून, सतत होणाऱ्या पावसामुळे रस्त्यावरील खडी निघून गेल्याने रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पूर्णपणे पाणी साचले असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखलही झाला आहे.

वाडीतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी याच रस्त्याने भोजदरी गावात जावे लागते. परंतु, रस्त्याने ये-जा करताना विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होतात. संतप्त झालेल्या पेमरेवाडी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे आता दीड किलोमीटर अंतराच्या आसपास जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून रस्ता मंजूर झाला आहे.

जोपर्यंत संपूर्ण रस्त्याचे काम मार्गी लागत नाही, तोपर्यंत आम्ही मतदानच करणार नाही, असा एकमुखी निर्णय येथील तरुणांसह वयोवृद्धांनी घेतला आहे. संपूर्ण रस्ता मंजूर झाला, तरच आम्ही ग्रामस्थ विधानसभा निवडणुकीत मतदान करू; अन्यथा आमचा बहिष्कार हा कायम राहील.

आज वाडीत एखादी व्यक्ती आजारी पडल्यावर डॉक्टरला वाडीत बोलवायचे असले तरी पेमरेवाडीचे नाव घेतले की, ते नाही म्हणून सांगतात. गाडीवालाही या रस्त्याने येण्यासाठी तयार होत नाही.

त्यामुळे आम्ही जगायचे तरी कसे? जर रस्त्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत असेल, तर आमचे मूलभूत प्रश्न कधी सुटणार, असा सवालही आदिनाथ पोखरकर, नीलेश पोखरकर, राजू पोखरकर, आनंद पोखरकर, सागर डोंगरे, माधव डोंगरे, संजय डोंगरे,

बबन डोंगरे, बाळशीराम डोंगरे, रोहिदास पोखरकर, विजय पोखरकर, गणेश पोखरकर, रामदास डोंगरे, रुपाली डोंगरे, साधना पोखरकर, अनुसया डोंगरे, सरुबाई पोखरकर, सीताबाई डोंगरे, संगीता डोंगरे, गऊबाई डोंगरे आदी ग्रामस्थांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment