लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नववधू प्रियकरासोबत फरार !

Published on -

नवी दिल्ली : लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नववधू प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत घडला. फोटोग्राफरच्या प्रेमात पडलेली तरुणी माहेरी येण्याच्या निमित्ताने प्रियकराचा हात धरुन फरार झाली.

दिल्लीतील गोकुलपुरी भागात हे प्रेमाचं त्रांगडं घडलं. लग्नाच्या महिनाभर आधी संबंधित तरुणीचं एका तरुणावर प्रेम जडलं. लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तिला लग्न मोडण्याचा धीर होईना. अखेर लग्नानंतर पळून जाण्याचा निर्णय तिने घेतला.

लग्नाच्या दिवशी तरुणीचा प्रियकरच फोटो काढण्यासाठी विवाहस्थळी आला. सप्तपदीनंतर मंडपातूनच पोबारा करण्याचा प्लान दोघांनी आखला होता. मात्र योजना यशस्वी न झाल्यामुळे ते दुसऱ्या संधीच्या शोधात होते.

लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूने नवरदेवाशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. आपल्याला किमान सहा महिन्यांचा अवधी देण्याची मागणी तिने केली. नवरदेवाला ही गोष्ट रुचली नाही. त्याने ही गोष्ट आपल्या सासूबाईंच्या कानावर घातली. त्यांनी लेकीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ठाम होती.

लग्नाच्या चार दिवसांनंतर विधींसाठी तरुणी माहेरी आली. त्यावेळी प्रियकर आणि तिची पुन्हा भेट घडली. ही संधी न दवडता दोघांनीही पळून जाण्यात यश मिळवलं. सोबत जाताना ती आपलं स्त्रीधनही घेऊन निसटली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe